। अलिबाग । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या नव्या विषाणूचे सावट पाहता शासन निर्देशानुसार 15 ते 18 वर्ष वयोगटासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संचालक मंडळ हायस्कूल, नागावमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.11) नागाव हायस्कूलमध्ये लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित राहून लसीकरण करणार्या विद्यार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले.
यावेळी नागांव ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर, डॉ. मकरंद आठवले, लसीकरण करणार्या कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक अजित पाटील, सहशिक्षिका जान्हवी बनकर, मोहन पाटील, गिरी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा-महाविद्यालयात करोनाचा शिरकाव होऊ लागल्याने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणास जिल्ह्यात सुरुवात झाली. याबाबत नागाव ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेत परिसरातील विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी शाळेतच लसीकरण मोहिमेस सुरुवात केली. त्यामुळे पालकांकडून ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर तसेच सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.