। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. जेएसडब्ल्यू कंपनीसाठी हे भुसंपादन होत असुन या भुसंपादनाला शेतकर्यांचा विरोध आहे. सरकारने शेतकर्यांना विश्वासात न घेता अधिसुचना काढली. हा प्रकल्प शेतकर्यांना मान्य नसून डोलवी एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, अन्यथा जेएसडब्ल्यू कंपनीचे दरवाजे बंद करण्याचा आक्रमक इशारा शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिला. गडब येथे गुरुवारी (दि.10) आयोजित करण्यात आलेल्या शेतकर्यांच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी आ. धैर्यशील पाटील, आ. रवी पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, वैशाली पाटील, प्रसाद भोईर, पेणचे शेकाप तालुका चिटणीस संजय डंगर, सरपंच अपर्णा कोठेकर. उपसरपंच दर्शना पाटील पाटील आदिसह शेतकरी उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले कि, राजकारणातील मतभेद बाजुला ठेवून एकत्र येत ही लढाई लढायची आहे. यापूर्वी तालुक्यातील शेतकर्यांनी सेझ विरुध्दची लढाई जिंकली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने या जमिनीची मागणी केली असेल तर आपली लढाई कंपनी विरोधात असेल. स्थानिकांना कंपनीत प्राधान्य मिळाले पाहीजे. या जिल्ह्यातील दोन मंत्र्यानी एमआयडीसी रद्द करावी, असे आवाहनही आ. जयंत पाटील यांनी केले. याशिवाय या प्रकरणाबाबत विधान परिषदेत आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भूसंपादनात या गावांचा समावेश
पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव- गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावातील 2100 एकर जमिन संपादित करण्यात येणार आहे. या भुसंपादनाला येथील शेतकर्यांनी विरोध दर्शविला आहे. या सभेत सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, वैशाली पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या जमिनी भलत्याच कोणाला आवडल्या म्हणुन देणार नाही. सरकारने शेतकर्यांना विश्वासात न घेता अधिसुचना काढली आहे. सरकारला मायेचा पाझर फोडल्याशिवाय राहाणार नाही. नोटीसी रद्द होईपर्यत येथील शेतकरी थांबणार नाही.
माजी आ. धैर्यशील पाटील
शेतकर्यांची एकजुट महत्वाची आहे. पुर्वजांनी जपणूक केलेल्या जमीनी वारसा हक्काने राखायच्या आहेत. पुढच्या पिढीला वारसा हक्क मिळाला पाहिजे. एमआयडीसी रद्द केली नाही तर येथील शेतकरी सरकारला ऐकणार नाहीत. विधान सभेत याबाबत आमदाम म्हणून आवाज उठविला जाईल.
-आ. रवी पाटील, पेण
पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी एमआयडीसी प्रकल्पाला शेतकर्यांनी विरोध दर्शविला असुन शेतकर्यांच्या या मागणीला आ. जयंत पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, आ. रवि पाटील यांनी पांठीबा दिला आहे. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग रज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्याच आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्री महोदयांनी सयुक्त बैठक घेवुन एमआयडीसी प्रकल्प रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवुन शेतकर्यांना दिलासा द्यावा.
के.जी. म्हात्रे, संयोजक, शेतकरी संघर्ष समिती