। पनवेल । प्रतिनिधी ।
एकीकडे मालमत्ता कर आकारनीला पालिका क्षेत्रातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यातच 1 एप्रिलपासून वेळेत कर न भरलेल्या नागरिकांना दंड स्वरूपात शास्ती लावण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. याबाबत शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेत शास्ती लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
यावेळी आ. बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, सतीश पाटील, अरविंद म्हात्रे, गोपाळ भगत, विष्णू जोशी, सखाराम पाटील, विजय खानावकर, रवींद्र भगत, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सुरेखा मोहोकर, कमल कदम, प्रज्योती म्हात्रे, भारती चौधरी, मंजुळा कातकरी, अरुणा दाभणे, प्रीती जॉर्ज, प्रिया भोईर, उज्ज्वला पाटील, सारिका भगत उपस्थित होत्या.
पालिका प्रशासन मालमत्ता कर लावण्याबाबत ठाम आहे.विशेष म्हणजे वेळेत कर न भरल्यास नागरिकांवर थकीत करासह दंड देखील भरावे लागणार असल्याने पनवेल मधील राजकारण पुन्हा तापणार आहे.मागील दोन वर्षांपासून सुरु असलेला मालमत्ता कराचा तिढा सुटताना दिसत नाही.राजकारणी नागरिकांना मालमत्ता कर भरू नका, शासन स्तरावर योग्य निर्णय होईल, असे आश्वासन देत असताना शासकीय स्तरावर कोणताच निर्णय होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या डोक्यावर मालमत्ता करासह शास्तीचा बोजा पडण्याची शक्यता आहे.
कर आकारणी करण्यासाठी पुढील एक वर्षांची मुदत वाढ दिली नाही तर पालिका क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. – प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते
मालमत्ता करात भरपूर त्रुटी आहेत. कर वाढ कमी होऊन कर धारकांना कोणतीही शास्ती/दंड/व्याज आकारणी करू नये व कर आकारणी करण्यासाठी पुढील एक वर्षांची द्यावी. – सतीश पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस