। पनवेल । वार्ताहर ।
मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रेमकवितेतून व्यक्त झालेला प्रियकर, भावकवितेतून व्यक्त होणारी तरुणी, शेतकर्यांची वेदना, स्त्रीची आई, मुलगी अशी विविध रूपे कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पनवेल महापालिका वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, नागरिकांना मिळाली. कारण या दिनाचे औचित्य साधत पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे,लेखाधिकारी डॉ.संग्राम व्होरकाटे, लेखाधिकारी विनयकुमार पाटील, तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रशांत मोरे, भरत दौंडकर, आबेद शेख, अनंत राऊत, राजेंद्र राठोड या कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली. शब्दालंकारांनी भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली.
महापालिकेच्या माध्यमातून 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यातील स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व मानचिन्ह यावेळी देण्यात आले.
कवी भरत दौंडकर यांनी लेक सासरचा वासा, लेक माहेराची मेढ,एका समईचा पडे दोन्ही घरात उजेड असे सांगत स्त्रीची विविध रूपे कवितेच्या माध्यमातून सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तर कवी प्रशांत मोरे यांच्या प्रसिद्ध’मैना’कवितेने काव्य संमेलनाचा शेवट झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाच्या शुभांगी चव्हाण, प्रास्ताविक उपायुक्त विठ्ठल डाके तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी केले.