अक्कादेवी बंधार्याला गळती;चिरनेर गावातील रहिवाशांच्या जीवितास धोका
। जेएनपीटी । वार्ताहर ।
चिरनेर ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे चिरनेर परिसरातील निसर्गही उपेक्षित राहिला आहे. त्यात पर्यटकांना आकर्षित करणार्या अक्कादेवी बंधार्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने, पावसाळ्यात बंधारा फुटला तर पाण्याचा लोंढा चिरनेर गावात शिरुन रहिवाशांच्या जिवीतास, भातशेतीस धोका निर्माण करु शकतो, अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई व रायगड येथील पर्यटन स्थळांमध्ये चिरनेर या निसर्गाचे वरदान लाभलेल्या आणि हुतात्म्यांच्या बलीदानाने पवित्र झालेल्या भूमीचाही समावेश आहे. अशा हुतात्म्यांच्या बलीदानाने आणि महागणपती देवस्थानमुळे पावन झालेल्या चिरनेर या इतिहास प्रसिद्ध भूमीला अगन्य महत्व प्राप्त झाले आहे. परंतु या पवित्र भूमीचे आणि नैसर्गिक संपत्तीचे, पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर करण्याकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आजही चिरनेरच्या डोंगररांगेत वड, साग, आंबा, जांभूळ, करवंद, रानकेळी, बिबट्यासह इतर वूक्षसंपदेचा समावेश आहे.नाग,अजगर व इतर सरपटणारे साप, फुलपाखरे तसेच ससा, भेकर, रानडुक्कर, मोर, रानमांजर, घोरपड, वानर व इतर अनेक प्राण्यांचाही जंगलात समावेश आहे.
अशा प्रकारे विविध प्रकारच्या पक्षी, प्राणी, वनसंपदेमुळे आणि पावसाळ्यात फेसाळून वाहणारा बंधारा पर्यटकांना आकर्षित करत असतो, त्यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी तसेच जागृत अशा महागणपती देवस्थान चरणी नतमस्तक होण्यासाठी व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी वर्गाबरोबर हजारो भाविक, देशभक्त, निसर्ग अभ्यासक, पर्यटक आप आपल्या कुटुंबासह वर्षभर या परिसराला भेटी देत असतात, परंतु स्थानिक ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि शासकीय अनास्थेमुळे हा परिसर उपेक्षित राहिला आहे.
सध्या पावसाळ्यात अक्कादेवी बंधार्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने बंधारा फुटला तर पाण्याचा लोंढा चिरनेर गावात शिरुन रहिवाशांच्या जिवीतास व भातशेतीस धोका निर्माण करू शकतो, अशी भिंती शेतकरी, निसर्गप्रेमी, पर्यटक व्यक्त करत आहेत.