। हर्णे । प्रतिनिधी ।
बंदरामध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला आग लागून करोडो रूपयांच नुकसान झाले आहे. यावेळी या घटनेमध्ये वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली असून जीवितहानी मात्र टळली आहे. रात्री हर्णे बंदरामध्ये 12 वाजण्याच्या सुमारास हर्णे, राजवाडी येथील रहिवाशी महेश मळेकर यांच्या बंदरातील हार्डवेअरच्या दुकानाला अचानक आग लागली. ही घटना प्रथम शेजारी असणार्या रामचंद्र पावसे याना दिसली त्यांनी लगेच आग लागली म्हणून बोंब मारली. लगेचच फत्तेगड, मल्लखांबपेठ, बंदरमोहल्ला, बाजारपेठ येथील सर्व ग्रामस्थ धावून आले.
स्थानिकांनी समुद्र ते आग लागलेलं ठिकाणापर्यंत साखळी मध्ये उभे राहून समुद्राच्या पाण्याचा बादलीच्या साहाय्याने मारा करायला सुरुवात केली. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. त्याचवेळी फत्तेगडावरील रहिवाशी बंदरात पाणीविक्री करणार्या निलेश दोरकूळकरने आपला पाण्याने भरलेला मोठा ट्रक त्याठिकाणी आणून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कुठे साधारण दीड वाजेपर्यंत किमान 80% आग आटोक्यात आली होती. दीडच्या सुमारास दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक ऋषिकेश गुजर व त्यांची टीम नगरपंचायतीचा पाण्याचा बंब घेऊन दाखल झाले. त्याने अखेर जोराच्या पाण्याच्या प्रवाहाने उरलेली आग पूर्णपणे विझवली. तोपर्यंत दुकानातील 100% समान जळून खाक झालं होतं. दुकानामध्ये बोटीकरिता लागणारे ऑइल, जाळी, ग्रीस, प्लास्टिक पाईप, लोखंडी साहित्य , गोडेतेल, सर्व प्रकारचे धान्य आदी सामान होते. ते सर्व जळून खाक झाल्याने सुमारे दीड कोटींच नुकसान झाले असल्याचे मालक महेश मळेकर यांनी सांगितले.






