। पालघर । प्रतिनिधी ।
मुंबईच्या आयएसपीएलने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था-महाराष्ट्र आयोजित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. यंदाचे त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद. आयएसपीएलचा आकाश शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला मोटर-बाईक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा-पालघर येथील नाना थोरात क्रीडांगणावरील मॅटवर हे सामने खेळविण्यात आले.
अंतिम सामन्यात आयएसपीएलने सीजीएसटी कस्टमचा प्रतिकार 43-26 असा सहज मोडून काढत जिजाऊ चषकासह रोख 1 लाख 51 हजार रूपये आपल्या खात्यात डिपॉझिट केले. उपविजेत्या कस्टमला चषक व रोख 1 लाख 11 हजार रूपयांवर समाधान मानावे लागले. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना चषक व रोख 33 हजार 333 रूपये देऊन गौरविण्यात आले. आयएसपीएलच्याच प्रतिक दाहिया याला आणि कस्टमच्या विकास काळे याला अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून निवडण्यात आले. प्रतिकला फ्रीज, तर विकासाला वॉशिंग मशीन देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आ.किसन कथोरिया, माजी मंत्री महादेव जानकर, आ. रवींद्र फाटक, आ.दौलत दरोडा, हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैद्येही वाढणं, ज्ञानेश्वर सांबरे, पंडित पाटील आदी मान्यवरांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आपली उपस्थिती राखली होती.