मुंबई, ठाणे, पुण्यातील चाकरमान्यांचा रीघ
। खेड । प्रतिनिधी ।
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आंबवली गावची ग्रामदेवता माता झोलाई देवीची त्रैवार्षिक यात्रा सोहळा 16 एप्रिल ते 21 एप्रिलदरम्यान होणार असून, मुंबई, ठाणे, पुण्यातील भाविक, गावकरी आणि चाकरमानी यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लाकडाची भव्य लाट तरुणांकडून हवेत खेळवण्याचा खेळ आणि त्यानंतर लाट फिरवण्याचा कार्यक्रम हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असते. आंबवली-वरवलीच्या परिसरातील अठरा गावांमधून येणार्या ग्रामदेवततांच्या पालख्या त्यांच्या आगमन आणि स्वागताची होणारी लगबग हे देखील या यात्रेतील अविस्मरणीय आणि नयनरम्य सोहळा असतो. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या या देवीचा उत्सव याची देही याची डोळा पाहण्यासाठी मुंबईतून शेकडो गावकर्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. श्रीझोलाई-सोमजाई यात्रा कमिटी व ग्रामस्थ आंबवली व वरवली हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत.
बुधवार 20 मार्च हा दिवस खर्या अर्थाने यात्रेचा दिवस असून त्या दिवशी वरवलीतील सोमजाई देवी आणि महाळुंग्यातील केदारनाथ यांची पालखीचे आगमन होणार आहे. ही दोन्ही ग्रामदेवता माता झोलाईचे बहीण व भाऊ असल्याची येथील मान्यता आहे. त्यांच्या स्वागतासाठी माता झोलाई वेशीपर्यंत जाते. याचा अर्थ गावकरी या दोन्ही ग्रामदेवतांच्या स्वागतासाठी जातात. त्यानंतर आजुबाजुच्या गावांमधील ग्रामदेवतांच्या पालख्या झोलाई मंदिरात येतात. गुरूवारी अखेरच्या दिवशी पालख्याचे पुजन केले जात असून, लाट फिरवण्याचा कार्यक्रमाने यात्रेचा समारोप होतो. आंबवली ग्रामस्थ, पुणे व मुंबई समिती या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्थापन करते, अशी माहिती आंबवली ग्राम विकास समिती यांनी दिली.