ग्रामस्थांची तहसीलदारांकडे कारवाईची मागणी
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील चिखलप ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत सर्व्हे नंबर 78/1/1 व 78/1/2 मध्ये स्फोट करून मोठ्या प्रमाणात डबरखाण उत्खनन सुरू आहे. सुरुंग स्फोटामुळे चिलखप गावातील घरांना हादरे बसून मोठ मोठे तडे गेले आहेत. याबाबत खाणमालकावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन म्हसळा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
चिखलप ग्रामपंचायतीमार्फत खाण उत्खनन बंद करण्याबाबत तक्रार अर्ज दाखल करूनही त्याला खाण मालकाने केराची टोपली दाखवत मनमानी होत असल्याने सदर खाणीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी चिखलप ग्रामस्थांनी म्हसळा तहसीलदार समीर घारे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे गाव अध्यक्ष सुडक्या जाधव यांनी सांगितले. तहसीलदार समीर घारे यांना तक्रार अर्ज देताना सरपंच अनिल जोशी, गाव अध्यक्ष सुडक्या जाधव, सचिव संतोष शिंदे, तानु मुंडे, पांडुरंग निर्मळ उपस्थित होते. तहसील प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारीची योग्य दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.