वातावरणातील बदलाचा बागायतीला बसणार फटका
। म्हसळा । वार्ताहर ।
फळांचा राजा आंबा हा यंदा कोकणात उशिरा येणार असल्याची शक्यता आंबा बागायतदार यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेले बदल किंवा खराब हवामानाचा फटका या पिकांना बसला आहे. त्यामुळे यंदा पिकांना मोहोर खूप कमी प्रमाणात आणि उशिरा लागल्याचे दिसण्यात येत आहे. कोकणातील आंबा या फळाला उत्तम व दर्जेदार असे वातावरण लागते.
परंतु उशिरा गेलेला पाऊस आणि सातत्याने झालेले वातावरणातील बदल या गोष्टीना कारणीभूत असल्याचे आंबा बागायतदारांचे मत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते. 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. यामुळे आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात पालवी येण्याची शक्यता आहे. यामुळे मोहराची प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यास त्याचा परिणाम हा आंबा हंगामावर होणार आहे.
म्हसळा-पाभरे येथील पारंपरागत आंबा बागायत व्यवसाय हा दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाभरे येथील अनुभवी आणि फार मोठे आंबा बागायतदार फैसल गीते यांच्या बागेतील पहिली आंब्याची पेटी डिसेंबरमध्ये वाशी एफएममसी मार्केटमध्ये जाणाचा आजपर्यंतचा रेकॉर्ड होता. परंतू या वर्षी मात्र, बदलत्या हवामानामुळे या रेकॉर्डला ब्रेक बसल्याचे बागायतदार फैसल गिते यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले कि, यावर्षी बागेत तुरळक प्रमाणात झाडावरती मोहोर आला असून त्यामुळे माझ्यासह इतर अन्य बागायतदार चिंतेत आहेत. बागा राखणे आणि त्यासाठी होणारी मेहनत आणि मशागत, मजुरी, खतपाणी यासाठी झालेला खर्च वसुल होईल कि नाही अशी चिंता वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा आंबा फेब्रुवारीमध्ये न मिळता तो एप्रिल महिना गाठण्याची शक्यताही फैसल गिते यांनी वर्तवली.
डिसेंबर महिन्यात जी आंब्याला कैरी लागलेली दिसण्यात येते ती आता खराब वातावरण व अवकाळी पावसामुळे दिसण्यात येत नाही. आता मोहोराला सुरूवात झालेली आहे. त्यामुळे यंदा आंबा हा फेब्रुवारीमध्ये न येता तो मार्च, एप्रिल या महिन्यात येण्याची शक्यता आहे. वातावरणाच्या बदलामुळे 5 ते 10 टक्के मोहोर आलेला दिसण्यात येत आहे.
– फैसल गीते,
आंबा बागायतदार, म्हसळा