उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. मात्र, स्थानिक, शेतकरी, भूमीपुत्रांच्या प्रश्न व तक्रारींकडे सुरवातीपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून यंत्रणांना हाताशी धरून मुस्कटदाबी व प्रचंड अन्यायकारक धोरण राबविले जात असल्याचा आरोप योगेश अडसुळे व इतर शेतकरी करीत आहेत. आपली पिढ्यान् पिढ्या असलेली मालकी हक्काची शेतजमीन वाचविण्यासाठी व आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकर्यांनी दंड थोपटले आहेत. योगेश अडसुळे हे बुधवारपासून (दि.11) बेणसे सिद्धार्थ नगर (रिलायन्सचे काम सुरू असलेल्या ठिकाणी) आमरण उपोषणास बसणार आहेत.
रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. येथील पाईपलाईनबाधित शेतकर्यांनी रायगड जिल्हाधिकार्यांना व इतर प्रशासन स्तरावर तक्रारी निवेदन दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्थानिकांच्या मागण्या व शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जावेत यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर, आरपीआय (आठवले)चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व पदाधिकारी, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार, वंचित बहुजन आघाडीचे नेते व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, बौद्ध समाज युवा संघाचे पदाधिकारी, बहुजन विद्यार्थी संघटनेचे नेते व पदाधिकारी तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
रिलायन्स ने प्रकल्प उभारत असताना येथील स्थानिक , भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही. अशातच येथील शेतकर्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनी कडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी योगेश अडसुळे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तक्रारी निवेदन दिले आहे. या संबंधीचे पत्र माहितीकरिता पोलीस अधीक्षक रायगड, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग, प्रांताधिकारी पेण, पोलीस निरीक्षक नागोठणे आदींना देण्यात आले आहे. सदर प्रकल्प उभारत असताना धक्कादायक म्हणजे यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेण्यात आली नाही तसेच स्थानिक भूमीपुत्र, शेतकरी, नागरिकांच्या, एकाही समस्येचे निराकरण करण्यात आले नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करूनही प्रशासनाने एकही बैठक लावली नसल्याने स्थानिकांतून असंतोषाची भावना उफाळून आली आहे. याप्रसंगी उपोषणकर्ते व अन्य आंदोलकांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास रिलायन्स व्यवस्थापन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आंदोलकांनी निवेदनातून दिला आहे.