। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात कार्य करणार्या युनायटेड वे या संस्थेकडून 42 गावांमधील जलसंजीवनी अभियानातील कार्य करणार्या शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हवामान बदल आणि माती परीक्षण या विषयवार हि कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यातील खांडस, नांदगाव, वारे आणि अंभेरपाडा ग्रामपंचायतमधील 42 गावातील शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा जल संजीवनी प्रकल्प कर्जत तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव आणि वारे ग्रामपंचायतमधील 42 गावात राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचा उद्देश गावांचा सर्वांगीण विकास करणे असून त्यात पिण्यासाठी पाणी उपलब्धता करून त्याचा इष्टतम वापर करणे आदी कामे प्राधान्याने केली जातात. दुसरीकडे बंधारे, सूक्ष्म सिंचन यावर भर देऊन शाश्वत शेती अंतर्गत हवामान बदलामुळे शेतीवर होणार्या दुष्परिणामांना कमी करून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे.
शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून राहणीमान उंचावणे, रोजगारनिर्मिती करणे, गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करणे करण्यासाठी युनायटेड वे काम करीत आहे. याप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी शिंदे माती परीक्षणाचे महत्त्व उपस्थित शेतकर्यांना माहिती दिली तर कळंब येथील कृषी पर्यवेक्षक सचिन केने यांनी एकात्मिक खत नियोजनवर शेतकर्यांना मार्गदर्शन केले आणि कृषी विभागाच्या विविध तसेच योजनांची माहिती दिली.
कृषी सहायक आकाश गावंडे आणि द्रोपद घुगे यांनी शेतकरी दुंदा काळू कोकाटे यांच्या शेतावर माती परीक्षणसाठी नमुना कसा गोळा करावा याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक किरण गंगावणे यांनी कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या शेतकर्यांना माती संवर्धन संबंधित शपथ दिली.
युनायटेड वे मुंबई जल संजीवनी प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग कर्जत यांच्या समन्वयाने माती परीक्षण ह्या विषयावर अंभेरपाडा ग्रामपंचायतमधील बेलाचीवाडी येथे आयोजित करण्यात आले. बेलाचीवाडी येथील कार्यक्रमात शेतकर्यांना माती परीक्षण अहवाल तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
जल संजीवनी प्रकल्पाचे समन्वयक विवेक कोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि वरिष्ठ कृषी तज्ज्ञ जोएब दाऊदी यांनी युनायटेड वे मुंबई संस्था आणि कृषी विभाग यांनी मिळून एकत्रितपणे कार्य केल्यास अधिक प्रभावीपणे कृषीचे उपक्रम राबविता येतील, असे मत व्यक्त केले.