शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, ग्रामस्थांचे भजन, जल्लोष संगीताचा ऑर्केस्ट्रा
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा सोमवार, दि. 2 मे रोजी पार पडणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे होणारी चौलमळा येथील आई कृष्णादेवीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सोमवार, 2 मे रोजी सकाळी 8 वाजता कृष्णादेवीच्या पालखी सोहळ्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. आईच्या मुखवट्याची मधुकर नाईक यांच्या घरापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरात सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, आ.प.ला. कट्टा संस्था, ऐरोली-नवी मुंबईचा शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. सायंकाळी सात ते रात्रौ नऊ वाजेपर्यंत कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळ, चौलमळा यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ नऊ वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ‘जल्लोष संगीताचा’ श्री. रोहित पाटील प्रस्तृत मराठी-हिंदी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.
तरी, सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चौलमळा गावचे सरपंच सुनील घरत, कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक, महिला मंडळ अध्यक्ष प्रमिता पाटील यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळाचे सर्व सभासद अहोरात्र मेहनत घेत आहेत.