। माथेरान । वार्ताहर ।
पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यामुळे माथेरान या पर्यटन स्थळावर कोणत्याही मोटार वाहनांना पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आली होती. परंतु रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी त्याचप्रमाणे येणार्या पर्यटकांनासुद्धा वेळप्रसंगी याचा लाभ होऊ शकतो, या महत्त्वपूर्ण हेतूने याठिकाणी रुग्णवाहिका सेवा मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आजवर अनेक दानशूर व्यक्तींनी अथवा खासदार निधीतून रुग्णवाहिका देणगी स्वरूपात रुग्णांच्या सेवेसाठी दिल्या आहेत.
सद्यस्थितीत इथे रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे दवाखान्यापासून ते (दस्तुरी नाका) मोटार वाहनतळापर्यंत तीनशे रुपये आकारले जात आहेत. दिवसभरात या गाडीच्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत पंधरा ते वीस फेर्या होत आहेत, त्यामुळे गाडीची किरकोळ दुरुस्ती आणि चालकांच्या वेतनाव्यतिरिक्त दर महिन्याला एक लाखाच्या आसपास रक्कम जमा होत असल्याचा अंदाज नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच जुनी गाडी झाल्यावर कुणा खासदारांच्या देणगीची प्रतीक्षा न करता स्वतःच नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव उत्पन्न रुग्णांच्या सेवेतून प्राप्त होत असल्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका असावी, असे स्थानिक नागरिक बोलत आहेत.







