विवेकानंद पाटील यांचा टोरंटसह सरकारला इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |
विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली सह्याद्री उद्ध्वस्त करणार असाल, तर 24 वर्षीय तरुणाचा इशारा समजा, पुन्हा झाडे तोडायला आलात, तर तुम्हाला नेस्तनाबूत करू, अशा आक्रमक शब्दांत विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी टोरंट कंपनी आणि सरकारला थेट आव्हान दिले. फडणवीस यांनी हा प्रकल्प रद्द करावा, आम्ही तुमचे कौतुक करू; मात्र सह्याद्रीच्या विनाशाला समर्थन देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी कर्जत येथील सभेत मांडली.
विकास झाला पाहिजे, विकासाला समर्थन देणारी आम्ही माणसे आहोत. रोजगार आले पाहिजेत, यासाठी आम्ही पुढे येत असतो. मात्र, एक पेड मां के नाम म्हणता आणि प्रत्यक्षात एक पेड नाही, तर त्यांनी एक पेड नावाखाली आमचे बापाचे आहे म्हणणे. झाडे लावायची नाहीत आणि झाडे तोडायची, हे तुमचे धोरण आहे, अशा शब्दांत विवेकानंद पाटील यांनी सरकारच्या पर्यावरणविषयक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
तुम्ही गुजराती आणणार असाल, तर गुजराती माणूस येथे आम्ही अंगावर घेऊ. महाराष्ट्र नेत्यांनी गुजरातच्या दावणीला बांधला आहे. सगळे प्रकल्प कोणाचे आहेत? गंगेचे पूजन करणारे आपले पंतप्रधान अदानी-अंबानी यांच्या दावणीला बांधले आहेत, असा आरोप त्यांनी केला. फडणवीस मुख्यमंत्री आहेत. तुमच्या राज्यातील मंत्र्यांनी 33 कोटीची झाडे आम्हाला मोजून दाखवावीत आणि तुम्ही नंतर 90 हजार झाडे दाखवू, असे सांगत वृक्षतोडीच्या आकडेवारीवरही त्यांनी सवाल उपस्थित केला.
आमचा विरोध सह्याद्रीमध्ये प्रकल्प येत असल्यामुळे आहे. यावर्षी पाऊस कमी झाला. सह्याद्रीला धडकणारे ढग एकदा धडकले नाहीत, तर पाऊस पडणार नाही. त्यामुळे सह्याद्रीवर घाव घालणार असाल, तर हा 24 वर्षीय तरुणाचा इशारा समजा. पुन्हा या ठिकाणी झाडे तोडायला आलात, तर आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत करणार, असा सज्जड इशारा पाटील यांनी दिला.
देशात आणि राज्यात पर्यावरण मंत्री कोण आहेत? त्यांना पर्यावरण काय माहिती? चार कायदे त्यांनी सांगून दाखवावेत, असे आव्हान देत त्यांनी पर्यावरण मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. शेकरू फक्त सह्याद्रीमध्ये सापडतो. उद्या भीमाशंकर उद्ध्वस्त केला, तर शेकरू नामशेष करण्याचा घाट घातला आहे. आमदार कमी पडत असतील, तर तुम्ही कुठून आणणार? शेकरू कुठून आणणार? खारुताईला शेकरू बनवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. झाडे तोडून ही माणसे गप्प बसणार नाहीत. काळा पाषाण शोधण्यासाठी 200 फूट खोल ड्रिल करणार असाल, तर सह्याद्री खिळखिळा होऊ शकतो. जैवविविधता नष्ट करू नका, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. झाडे तोडली तर प्रवक्ते फिरायला लागतील, त्यांना कावळे पिंडाला शिवायला मिळणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी वृक्षतोडीच्या परिणामांचा इशारा दिला. सरकार प्रचंड धूर्त आहे आणि सरकार चुकत आहे, हे मला पण पटत आहे, असेही ते म्हणाले.
प्रकल्प रद्द करा, फडणवीसांचे कौतुक करू!
फडणवीस यांनी प्रकल्प रद्द करा आणि तुमचे कौतुक करू. मात्र, तुमची मजबुरी आहे. इलेक्ट्रोल बाँड दिल्याने भाजपचा नाईलाज झाला आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते. महाराजांचा इतिहास आम्हाला माहिती आहे. पुन्हा इतिहास लिहिला जाईल, असे सूचित करत पाटील यांनी सरकारला इशारा दिला. सरकारचे हस्तक पर्यावरणाची हानी करण्याचे काम करत आहेत. यामुळे आदिवासी लोकांचे जीवनमान संपुष्टात येणार आहे, हेही लक्षात घ्या, असे ते म्हणाले. वन, जंगल, जल आमच्या स्थानिकांचे आहे. आमचे आयुष्य हिरावून घेऊ नका. झाडे खाण्याचा रोग झालेले झाड खाऊ यांना घाबरण्याचे काम नाही. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी माणसाच्या उरावर पाय!
सरकारने मराठी माणसाच्या उरावर पाय दिला आहे आणि आता झाडांच्या उरावर पाय देण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी येथील मी असून, माझ्या भागात सह्याद्री वाचवण्यासाठी तुम्ही याल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण मंत्र्यांनी चार कायदे सांगावेत!
मंत्री पर्यावरणाच्या दृष्टीने सक्षम नाहीत, हे दिसून येत आहे. ‘सह्याद्रीकडे चला’ म्हणा आणि येथे येऊन 23 प्रकल्प रद्द करू, असे जाहीर आवाहन करण्याची वेळ आली आहे. पर्यावरणाची हानी रोखायची असेल, तर सरकारने प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केली.






