शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांच्या हस्ते अनावरण
| अलिबाग | प्रतनिधी |
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या दैनिक कृषीवलच्या दिवाळी अंकाचे कर्जत आणि अलिबाग येथे उत्साहात प्रकाशन करण्यात आले. शनिवारी (दि. 7) कर्जत येथे प्रसिद्ध अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे आणि विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांच्या हस्ते, तर रविवारी (दि. 8) अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा मा. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाले.
सह्याद्री वाचवण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या ‘सेव्ह सह्याद्री’ चळवळीच्या कर्जतमधील सभेत शनिवारी कृषीवल दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत, जिल्हा प्रतिनिधी प्रमोद जाधव, नेरळ प्रतिनिधी संतोष पेरणे, कर्जत तालुका पर्यावरण बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे, शेकाप महिला कार्यकर्त्या स्वीटी बार्शी आदी मान्यवरांसह सह्याद्रीप्रेमी, शेतकरी आणि पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रविवारी अलिबाग येथे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत आणि संपूर्ण कृषीवल परिवार उपस्थित होता.
गेली 90 वर्षे पत्रकारितेची परंपरा जपणाऱ्या कृषीवलने शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणे हीच कृषीवलची ओळख राहिली आहे. याच परंपरेला पुढे नेत यंदाच्या दिवाळी अंकात ‘मोर्चे, आंदोलने, जनसंघर्ष’ या विषयाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरातील विविध आंदोलनांचा वेध घेण्यात आला आहे. आंदोलनांची पार्श्वभूमी, त्यामागील प्रश्न आणि समाजावर उमटलेले पडसाद यांचे सविस्तर विश्लेषण अंकात करण्यात आले आहे.
यंदाच्या अंकात अनेक मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा आजवरचा जनआंदोलनातील संघर्ष कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत यांनी आपल्या लेखातून मांडला आहे. अदानीच्या स्मार्ट मीटरमधून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी लेखातून उघड केले आहे. तरुणाई जेव्हा पेटून उठते, तेव्हा सत्तेलाही तिच्या ताकदीपुढे झुकावे लागते, या विषयावर सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांनी भाष्य केले आहे.
विद्यार्थी व्यवस्थेला प्रश्न विचारू लागला, तर त्या व्यवस्थेची झोप उडवण्याची ताकद त्याच्यात असते, हे एमपीएससीच्या पुण्यातील आंदोलनाचा चेहरा बनलेल्या विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी आपल्या लेखातून परखडपणे मांडले आहे. सध्या देशभरात चर्चेत असलेल्या आणि पर्यावरणाच्या हानीशी जोडल्या गेलेल्या कर्जतच्या टोरंट प्रकल्पामुळे परिसराचे होणारे नुकसान पत्रकार संतोष पेरणे यांनी लेखातून मांडले आहे. आंदोलनांदरम्यान कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांची भूमिका कशी असावी, यावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.
यंदाच्या अंकाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे अलिबाग तालुक्यातील रांजणखार शेफ सुनील माळी यांचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांच्या खास पाककृती. इन्स्टाग्रामवर ‘शेफ सुनील’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सुनील माळी यांना एकेकाळी महाविद्यालयाची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले आणि आज ते हेड शेफ म्हणून कार्यरत आहेत. संघर्षातून यश मिळवण्याचा त्यांचा प्रवास आणि त्यांच्या खास रेसिपीज वाचकांसाठी दिवाळी अंकात देण्यात आल्या आहेत. याशिवाय शरद कोरडे आणि अनिल जावकर यांच्या कथा, तसेच विविध आंदोलनांवर परखड भाष्य करणाऱ्या कवितांचाही अंकात समावेश आहे. विविध लेख, कथा, कविता, आंदोलनांचा वेध आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे प्रवास अशा वैविध्यपूर्ण साहित्यामुळे कृषीवलचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी विशेष वाचनीय ठरणार आहे.






