। पेण । प्रतिनिधी ।
राज्यातील हजारो एसटी कामगार सहा महिने संपावर गेल्याने वेळापत्रक कोलमडून पडले होते. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह ग्रामीण भागातील नागरिकांचे यात प्रचंड हाल झाले. काही दिवसांपासून ही सेवा पूर्वपदावर येताच जिल्हयातील ग्रामीण भागाच्या कानाकोपर्यात एसटीची फेर्या वाढल्या आहे. यामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे मात्र गेली सहा महिने लाल परीच्या गैरहजेरीत काळी पिवळी राणी सर्वसामान्यांना ने -आण करत होती. परंतू लाल परी पूर्ववत रस्त्यावर येताच काळी पिवळी राणीच्या रोजच्या गल्ल्यामध्ये फरक पडू लागला आहे.
रायगड जिल्हयातील एकूण आठ आगारांतील दीड हजाराहून अधिक एसटीच्या ग्रामीण भागातील फेर्या पूर्ववत झाल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांसह कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगावर्ग पुन्हा एकदा नियमित कामावर हजर होउ लागले आहेत. नागरिकांचे खोळंबलेली कामेही सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याने खिशाच्या कात्रीला लगाम बसला आहे. सुखकर प्रवास, आर्थिक बचत होत आहे. सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, इतर पासधारक नोकरवर्गांना मिळणार्या सवलतीसोबत एसटी जोमाने धावत असल्याने घंटीचा आवाज पुन्हा ऐकू येउ लागला आहे. त्यामुळे मधल्या काळात कळत नकळत जास्तीचा भाडा घेउन काळी पिवळी राणी जोमाने धावत होती. यामध्ये नागरिकांना आर्थिक भूदंडाला सामोरे जावे लागे. रायगड जिल्हयातील महाड-132, अलिबाग-226, पेण-343, श्रीवर्धन-200, कर्जत-238, रोहा-234, मुरुड-69, माणगाव-213 या आठ आगारांमधील एकूण 1698 एसटीच्या फेर्या आत्तापर्यंत सुरु झाल्या आहेत. मात्र रायगड जिल्हयातील विक्रम, मिनीडोअर, इको यांच्या फेर्यांवर मोठा परिणाम झाला आहे. जवळपास रोजच्या धंदामध्ये 25 ते 30 टक्कयांची घट होउ लागली आहे.
विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
आज प्रथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळयाची सुट्टी लागली असली तरी महाविद्यालयीन शासकीय तंत्र निकेतन आयटीआय यांच्या सह अनेक शासकीय कोर्स मध्ये शिकत असणार्या विद्यार्थ्यांना एसटीमार्फत विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये सवलत दिली जाते. यात ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांना अधिक फायदा होता. सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती कारण खाजगी वाहनातून प्रवास करणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शक्य होत नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सवलतीचा लाभ मिळू लागला आहे. परिणामी, मैलांची पायपीट विद्यार्थ्यांची थांबली आहे.
एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे दीर्घकाळ एसटी सेवा बंद होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आता एसटी जोमाने सुरु झाल्याने ग्रामीण भागातील बंद पडलेली सेवाही पूर्ववत झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे, याचे समाधान वाटत आहे. – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक रायगड
धंदयात 25 टक्केंनी घट
संपाच्या काळात माझ्या विक्रम, मिनीडोअर, इको चालकांनी त्यांच्या परिने सर्वसामान्यांची सेवा केली. महागाईचा आणि इंधन दर वाढीचा विचार करता एसटी पेक्षा काही प्रमाणात आमचे भाडे नक्कीच जास्त असेल, परंतु सेवा देतांना आम्ही कोठेही कमी पडलो नाही. एसटी सुरु होणे ही काळाची गरज आहे. कारण ज्या प्रमाणाने आमचे कुटुंब आहेत त्याच प्रमाणाने एसटी वाहक चालक यांना देखील कुटुंब आहेत. एसटी सुरु झाल्याने रोजच्या धंदयावर 25 टक्कयांनी परिणाम झाला आहे. असे असतांना देखील माझ्या चालक- मालकांची काहीही तक्रार नाही. – विजय पाटील जिल्हा अध्यक्ष विक्रम, मिनीडोअर चालक -मालक संघटना