अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल तक्रारी
। नेरळ । प्रतिनिधी ।
मुदत संपलेल्या माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य निवडणूक आयोग यांनी 1 जानेवारी 2022 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार माथेरान पालिकेच्या 20 जागांसाठीचा प्रारूप आरखडा रायगड जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकारी यांनी जाहीर केला आहे. दरम्यान त्या प्रारूप आराखड्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार्या संभाव्य आरक्षणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय बाजूला ठेवून 27 टक्के ओबीसी आरक्षणाच्या जागा या सर्वसाधारण गटामध्ये समाविष्ट करून प्रारूप जाहीर करणे, त्या आराखड्यास हरकती, सूचना आक्षेप घेणे, त्या हरकतींवर रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून सुनावणी घेणे, कोकण आयुक्त यांच्याकडून प्रारूप प्रभाग रचना आरखडा अंतिम करणे आणि अनुसूचित जाती-जमाती यांचे आरक्षणासह प्रारूप आरखडा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाने राबविला जात आहे. माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेसाठी लोकसंख्येनुसार तीन जागा वाढल्या असून आता माथेरानमध्ये पालिका निवडणुकीसाठी 20 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 10 प्रभागात प्रत्येकी दोन दोन जागा असे दहा प्रभागातून 20 सदस्य निवडले जाणार आहेत. ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन 20 पैकी 16 जागा या सर्वसाधारण असणार आहेत. तर अनुसूचित जाती साठी तीन आणि एक जागा अनुसूचित जमाती साठी राखीव असणार आहे, 20 जागांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण आहे.
माथेरान पालिकेचा प्रारूप आरखडा जाहीर करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून अधिकार दिलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी प्रारूप आरखडा 10 मे रोजी प्रसिद्ध केला होता. त्या प्रारूप आराखड्यास हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी 14 मे पर्यंत कालावधी होता. या कालावधीत माथेरान पालिका मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात प्रभाग सात मधील अनुसूचित जमाती आरक्षणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्या प्रभागात राहणारे महादेव कोळी समाजातील लोकांची संख्या आहे. मात्र त्याच समाजातील संदीप कदम हे अनुसूचित जमाती जागेवर 2017 मध्ये निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांना महादेव कोळी म्हणून जात वैद्यता प्रमाणपत्र मिळविता आले नव्हते आणि त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात आले होते. नंतर त्यांनी मुंबई उच्च नायायालयात धाव घेतली होती आणि त्यानंतर सुनावण्या झाल्या. पण आजपर्यंत संदीप कदम यांना अनुसूचित जमाती चे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नव्हते असे गिरीश पवार यांनी घेतलेल्या हरकतीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे लोकसंख्या असलेल्या प्रभागात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करणारे आणि प्रभाग सातमध्ये टाकण्यात आलेल्या संभाव्य आरक्षणास आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने घेण्यात आला आहे.
प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे माथेरानचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस अजय सावंत, माथेरान शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश दळवी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गिरीश पवार, नितीन सावंत यांच्यासह मिलिंद कदम आणि शैलेश बापर्डेकर यांनी या हरकती घेतल्या आहेत. त्यासर्व हरकती यांच्यावर सुनावणी रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर 23 मे रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 6 जून रोजी कोकण आयुक्त हे प्रारूप प्रभाग रचना अंतिम करणार आहेत. तर 7 जून रोजी अंतिम प्रभाग रचना प्रारूप आरखडा प्रसिद्ध केला जाणार आहे.
मागील निवडणुकीत आमच्या शेजारच्या प्रभागात अनुसूचित जमातीचे आरक्षण होते. त्यावेळी तेथून निवडून आलेय लोक प्रतिनिधी यांना आजतागात जात वैद्यता प्रमाणपत्र मिळविता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तेथून महादेव कोळी समाजातील व्यक्ती निवडून गेल्यास त्यांचे पद रिक्त होऊ शकते. त्यामुळे ज्या प्रभागात खरोखर आदिवासी समाजाचे लोक राहतात त्या ठिकाणी ते आरक्षण असावे अशी आम्ही पक्ष म्हणून लेखी मागणी केली आहे आणि आक्षेप घेतला आहे. अजय सावंत, माजी नगराध्यक्ष
प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. त्या हरकती आणि आक्षेप यांची सुनावणी रायगड जिल्हाधिकारी 23 मे रोजी घेणार आहेत. सुरेखा भणगे, मुख्याधिकारी







