। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात भारनियमनामुळे वीज गायब होण्याचे प्रमाण जास्त आहे. दर मंगळवारी दुरुस्तीची कारणे सांगून संपूर्ण दिवस तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. ग्राहकांकडून वीजबिल वसुली करण्यात नेहमी अग्रेसर असलेल्या महावितरण विभागाला सुरळीत वीज पुरवठा ठेवणे मात्र नेहमी अवघड जाते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांपैकी जीर्ण झालेले विद्युत खांब, विद्युत तारांजवळ वाढलेली झाडे, उघड्या डीपी यांसारखी इत्यादी कामे अद्यापही महावितरण विभागाकडून करण्यात आलेली नाहीत. महावितरण विभागाचे कर्मचारी वीजबिल वसुलीच्या कामात एवढे मग्न झाले आहेत की त्यांना ही कामे करण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे सध्या सुरू असलेला विजेचा लपंडाव पावसाळ्यातही कायम राहिला नाही म्हणजे झाले.
पावसाळी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. परंतु या कामांसाठी वेळ कमी पडतो. आठवड्यातून केवळ मंगळवारी वीजपुरवठा बंद असल्याने त्याच दिवशी काम करता येते. जर आठवड्यातून किमान दोन दिवस मिळाले तर काम लवकर पूर्ण करता येईल.
के.डी. महेंद्रीकर, उपकार्यकरी अभियंता तळा