नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील संत रोहिदास नगरमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून, ग्रामस्थांनी याबाबत माहिती देऊनही नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
तळा शहरात काही भागात धरणाजवळ असलेल्या बोअरिंगमधून, तर काही भागात आंबेळी येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आंबेळी येथून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाण्यात कचरायुक्त गाळ, प्राण्यांची कातडी, जंतू अशा प्रकारे दूषित पाणी नळाद्वारे येत आहे. याबाबत नागरिकांनी नगरपंचायत कर्मचार्यांना कळवूनदेखील कर्मचार्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. तसेच येथील लहान मुले आजारी पडू लागल्याने गेल्या दहा दिवसांपासून येथील नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
याबाबत ग्रामस्थांतर्फे नगरपंचायत मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात येणार असून, त्यानंतरही कार्यवाही झाली नाही तर शुद्ध पाण्यासाठी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.