| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात मागील काही महिन्यांपासून भटके कुत्रे ही मोठी समस्या बनली आहे. कर्जत नगरपरिषदेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम यशस्वी होत नसल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या यामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, कर्जत शहर भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम कधी सुरु करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्जत नगरपरिषदेकडूनदेखील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम आखली आहे. मात्र, या कामाचा ठेका देण्यात आलेली संस्था काम करीत नाही. त्यामुळे पालिका त्या ठेकेदाराला पोसते कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्य कर्जतकरांना पडला आहे. शहरातील नागरिक हे वाढलेल्या कुत्र्यांच्या समस्येमुळे अडचणीत आले आहेत.
कर्जत शहरातील एकही भाग आणि आळी ही भटक्या कुत्र्यांशिवाय मोकळे आहे, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी नागरिक विविध नवीन मार्ग शहारत शोधत आहेत. पण, तरीदेखील त्या प्रत्येक रस्त्यावर भटके कुत्रे आढळून येत असल्याने कर्जत शहरातील नागरिक पालिकेकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत.