कर कमी केला नाहीतर आम्ही राजीनामे देऊ
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर नगरपंचायतीने मालमत्ता करवाढीच्या नोटिसा नागरिकांना बजावल्या गेल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड उद्रेक झाला असून, शुक्रवार (दि.13) रोजी सर्वसाधारण सभेच्या वेळी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. उपस्थित नगरसेवकांनी सभेत करवाढीला विरोध केला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी देत करवाढ कमी झाली नाहीतर वेळप्रसंगी सर्व नगरसेवक राजीनामे देऊन नगरपंचायत बरखास्त करू, असा शब्द जंगम यांनी दिला आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात नागरी मूलभूत सोयी सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशी परिस्थिती असतानाच शासनाकडून मालमत्ता करात वाढ करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याने नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी खालापूर शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नवीन घाटवळ, उमेश गावंड, महेश राठी, कौस्तुभ जोशी, वैभव भोईर, नानू सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरत सर्वसाधारण सभेत करवाढीला विरोध करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नगराध्यक्षा रोशना मोडवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभे घेण्यात आली. याप्रसंगी उपनराध्यक्ष संतोष जंगम, प्रभारी मुख्याध्याधिकारी वैभव गारवे, लेखापाल सुनील विश्वासराव, कर निरीक्षक जितेंद्र यादव, अक्षय लोंढे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा होईपर्यंत नागरिक कार्यालयासमोर उभे राहिले होते.
अखेर सर्वसाधारण सभा संपल्यानंतर उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी सभेचा इतिवृत्त वाचून दाखवत करवाढीच्या ठरावाला नगरसेवकांनी विरोध केल्याचे सांगत ठराव नामंजूर करण्यासाठी नगरसेवकांची हवे असलेली उपस्थित होती, असे सांगत प्रभारी मुख्याधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख ग्रामस्थांची संबंधित खात्याच्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन यामध्ये करवाढ कमी झाली नाहीतर वेळप्रसंगी आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामे देऊन नगरपंचायत बरखास्त करू या लढ्यात तुमच्यासोबत राहू, असा शब्द उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी नागरिकांशी बोलताना दिला आहे.