व्यावसायिक परवानगी देताना नियम धाब्यावर
| महाड | प्रतिनिधी |
ऐतिहासिक महाड शहरात उभ्या राहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासमोर व्यावसायिक परवानगी देताना पालिकेने नियम धाब्यावर बसवले आहेत. तर, पोलीस प्रशासनदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय, राष्ट्रीय स्मारकाची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये सामाजिक समतेची बीजे रोवली. यामुळे महाडचे नाव जागतिक पटलावर नोंदवले गेले. मात्र, या ऐतिहासिक शहरामध्ये वाहतुकीचे आणि शहर नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील सर्वच भागात बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय स्मारकासमोर इमारत परवानगी देताना नियम धाब्यावर बसवून महाड नगरपालिकेने परवानगी दिली आहे. याबाबतीत वारंवार तक्रारी होऊनदेखील कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या ठिकाणी आपला बाजार आणि आरसी का इलेक्ट्रॉनिक्स या दोन व्यावसायिक दुकाने सुरू झाली आहेत. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जात आहे. ग्राहक आपले वाहन रस्त्यावर पार्किंग करून तासनतास खरेदी करतात. शिवाय राष्ट्रीय स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच विनापरवानगी रिक्षा उभ्या केल्याजात आहे. यामुळे धोतर्फा वाहन पार्किंग होऊन ये-जा करणार्या वाहनांना त्रास होत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी 20 मार्च रोजी लाखो भीमसैनिक भेट देत असतात शिवाय शासकीय कार्यक्रम तसेच निवडणुकांचे कार्यक्रमदेखील याच ठिकाणी होत असतात. यामुळे राष्ट्रीय स्मारकासमोर कायम वाहनांची गर्दी असते. आता याच स्मारकासमोर व्यावसायिक इमारतीला परवानगी देत असताना केवळ रहिवासी पार्किंगचा नियम लावून इमारतीला पार्किंग देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी आपला बाजार आणि आरसीका इलेक्ट्रॉनिक्स असे दोन मोठे व्यवसाय सुरू असल्याने या ठिकाणी येणारे ग्राहक आपल्या वाहनांची पार्किंग रस्त्यावरच करून जातात. त्यातच आपला बाजार मध्ये ग्राहकांना घेऊन येणारे रिक्षा चालक स्मारकाच्या मुख्य द्वारासमोरच पार्किंग करून बसून राहतात. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत नगरपालिका आणि पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. शहर नियोजनामध्ये पालिका प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने याबाबतीमध्ये जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालावे, अशा प्रकारची मागणीदेखील नागरिकांकडून केली जात आहे.
या ठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीबाबत सदर इमारतीला आणि त्या ठिकाणी असलेल्या दुकानांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. याबाबत उपाययोजना न झाल्यास कारवाई केली जाईल.
– धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, महाड नगरपालिका