| तळा | प्रतिनिधी |
चरई-गौळवाडी मार्गावरील अनेक दिवसांपासून तुटलेल्या लोखंडी कठड्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने प्रवास करत असल्याने हा भाग अत्यंत धोकादायक बनला होता.
ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात होता.याबाबतीत सरपंच प्रवीण अंबारले, ॲड. निमेश दिवेकर, केतन वाजे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. दैनिक कृषीवलमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून लोखंडी कठड्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्यालगत असलेला कठडा तुटल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत होता. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने काम सुरू केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी कामाची गुणवत्ता टिकवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रश्नावरून स्थानिक राजकारणही तापल्याचे चित्र दिसून आले. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करत नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला होता हा प्रश्न केवळ राजकारणापुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. अपघात झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का?, ही दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली. दरम्यान सध्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





