। पोयनाड । वार्ताहर ।
आजवर आपण काका पुतण्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. ‘काका मला वाचवा’ हे वाक्य सर्वत्र प्रसिद्ध आहे, पण प्रत्यक्षात काकांनी वाचवलेत आपल्या पुतण्याचे प्राण. पोयनाड गावचे रहिवासी असलेले दिलीप गजानन कारेकर (वय 55) यांनी आपला पुतण्या अक्षय चंद्रशेखर कारेकर (वय 28) याला आपली किडणी दान करून नवे जिवनदान दिले आहे. अक्षयच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. ऐन उमेदीच्या काळात गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या आपल्या पुतण्याला किडणी दान करून काकांनी पुतण्यावरचं प्रेम प्रत्येक्षात सिद्ध करून दाखवले आहे. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये 18 मे रोजी किडणी ट्रान्सप्लांटची यशस्वी प्रक्रिया डॉ.अविनाश चौधरी, डॉ. अमोलकुमार पाटील, डॉ.अमर कुलकर्णी यांनी केली. यामध्ये काका आणि पुतण्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.







