रात्री होतेय विजबत्ती गुल, नागरिक प्रचंड त्रस्त
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विजवीतरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जातेय. रोज रात्री विजबत्ती गुल होत असल्याने शिहू बेणसे विभागातील जनता प्रचंड त्रासली आहे. तर विजवितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आली आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा जनमाणसातून संताप व्यक्त होत आहे.
शिहू बेणसे परिसरासह अन्य भागात विजेचा लपंडाव काही केल्या थांबेना. रात्री मच्छर रक्त पितायेत याबरोबरच उन्हाळ्यात उष्म्याने अंगाची लाहीलाही होतेय, येथील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव थांबवा, वीजपुरवठा सुरळीत करा, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा संताप महिला वर्ग व तरुणाईतून व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होणे नित्याचेच, मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असून ही कधी दिवसा तर कधी रात्री विजबत्ती गुल होते. विजवीतरण अधिकारी व कर्मचारी मात्र मंद गतीने पाऊले टाकताना दिसत आहेत. विजबत्ती गुल झाल्यावर कर्मचारी नॉटरीचेबल होत आहेत. विजवीतरण कर्मचार्यांची कार्य तत्परता दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित होताच बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत, नेटवर्क सेवा बंद पडत आहे. इंटरनेट सुविधेशी संबंधित सर्व शासकीय निमशासकीय कामे बंद होत आहेत. याठिकाणी कधी सलग तीन चार दिवस तसेच अनेकदा दहा दिवसही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून वीजवितरण च्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील सततची विजसमस्या सर्वानाच डोकेदुखी ठरत आहे. सध्या पावसाळा सुरू असून आता तर वीज समस्या अधिकच त्रासदायक ठरत आहे.
शिहू बेणसे विभागात आदिवासीवाड्यापाड्यांचा समावेष असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. अशातच सातत्याने विजपुरवठा खंडीत होत असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. अशातच असह्य उष्म्या पासून बचाव करण्यासाठी लोक घराबाहेर बसत आहेत. सर्प,विंचू व किटकांची भिती असल्याने अंधारात घराबाहेर बाहेर पडणे नागरीकांना धोक्याचे झाले आहे. तसेच डास व मच्छरांच्या उपद्रवाने नागरीकांच्या आरोग्य देखील धोक्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर व्यवसाईक व व्यापारी वर्गाचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान विजवीतरण अधिकारी व कर्मचारी यांनी या विभागाची विजसमस्या कायम संपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.