दिवसाआड होणार पाणीपुरवठा
देहरंग धरणातील पाण्याने गाठला तळ
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारा देहरंग धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे पनवेल शहरावर अपुर्या पाणी पुरवठ्याची नामुष्की येण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला पालिकेचा पाणीपुरवठा विभागाला एमजेपी व एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबमन रहावे लागणार आहे. धरणाने तळ गाठल्याने पनवेलवासीयांवर लवकरच दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट ओढवणार आहे.
पालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहराला दररोज सुमारे 28 एमएलडी पाण्याची गरज भासते. पालिकेचा पाण्याचा मुख्य स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा विभागाला पर्यायी व्यवस्थेवर अवलंबून रहापवे लागणार आहे. धरणाने तळ गाठल्याने शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाचे विलास चव्हाण यांनी सांगितले. नियोजनाच्या दृष्टीने शहरात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो असे चव्हाण यांनी सांगितले. दरवर्षी एप्रिल महिन्यातच धरण तळ गाठत असते. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धरणाचे पाणी पनवेलकरांना मिळाले. यावर्षी दहा दिवस अगोदर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, तसे झाल्यास आटलेल्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. मात्र पावसाळा लांबणीवर गेल्यास शहरवासीयांवर पाणीसंकट आणखी उग्र रूप धारण करणार आहे. त्यामुळे पावसावर पनवेलकरांच्या पाणीपुरवठ्याचे गणित अवलंबून आहे.
पालिका क्षेत्रात सिडको नोडमध्ये खारघर, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल याठिकाणी अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. संपूर्ण उन्हाळा येथील रहिवाशांना अपुर्या पाणीपुरवठ्याला तोंड द्यावे लागले आहे. या मुद्यावरून रहिवाशांनी मोर्चे, निदर्शने, आंदोलने केली आहेत. मात्र आता दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय शहरात लागू झाल्यास शहरातील नागरीकांना देखील अपुर्या पाणीपुरवठ्याची झळ सोसावी लागणार आहे.
देहरंग धरणाने तळ गाठल्याने धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. एमजेपी आणि एमआयडीसीकडून शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
-विलास चव्हाण, मुख्य पाणीपुरवठा अधिकारी, पनवेल महानगरपालिका







