। पनवेल । प्रतिनिधी ।
भारतात ई-सिगारेट उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, साठवणूक आणि विक्रीवर संपूर्ण बंदी असतानाही, खारघर सेक्टर-4 मधील ‘द स्मोक शॉप’ या दुकानात उघडपणे ई-सिगारेटची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खारघर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी या दुकानावर छापा मारून तेथून हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. खारघर सेक्टर-4 मधील भूमी टॉवर इमारतीतील शॉप नं. 20 येथे असलेल्या द स्मोक शॉपमध्ये ई-सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी येथे छापा मारला असता, विविध फ्लेवर्स आणि ब्रँड्सचा ई-सिगारेटचा साठा आढळला. त्यावर पोलिसांनी हा ई सिगारेटचा साठा जप्त करून दुकानचालक अहमद आदम साबीर (22) याच्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर नोटीस बजावल्याचे पोलिसांनी सांगितले.






