। पनवेल । प्रतिनिधी ।
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना अश्लील भाषेत धमकावल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, बुधवारी (दि.18) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 13 वर्षीय मुलीला उद्देशून अश्लील स्वरूपाची भाषा वापरली. तसेच मुलगी आणि तिच्या आईला धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस मित्र अपराध नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची भेट घेतली. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घाडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांमध्ये पीडितांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.






