। पनवेल । प्रतिनिधी ।
विवाहासाठी जोडीदाराचा शोध घेत असलेल्या खारघरमधील 37 वर्षीय तरुणीला मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या भामट्याने लग्नाचे आमिष दाखवून 29 लाख 51 हजार 947 रुपयांना गंडा घातला. ब्रिटनमधून आणलेला ब्रिटिश पौंडचा डिमांड ड्राफ्ट मुंबई विमानतळावर अडकल्याचे सांगून तो सोडविण्यासाठी विविध शुल्कांच्या नावाखाली आरोपीने 73 वेळा ऑनलाइन व्यवहार करून पैसे उकळले. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर 36 येथील तरुणीची ‘जीवनसाथी मॅट्रिमोनियल’ या विवाहविषयक संकेतस्थळावर अभिजीत केशव शिंदे नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. आरोपीने बनावट प्रोफाईल तयार करून तरुणीशी संपर्क साधला होता. विवाहाचे आश्वासन देत त्याने तिचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी आरोपीने ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात ब्रिटिश पौंड आणल्याचे आणि त्याचा डिमांड ड्राफ्ट मुंबई विमानतळावरील कस्टम व इमिग्रेशन विभागाने रोखून धरल्याचे सांगितले. हा ड्राफ्ट सोडविण्यासाठी सरकारी कर, रिझर्व्ह बँकेची प्रक्रिया, सीबीआयची मंजुरी, ना हरकत प्रमाणपत्र आणि प्रक्रिया शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगून त्याने तरुणीकडे पैशांची मागणी केली.
फसवणुकीला विश्वासार्ह स्वरूप देण्यासाठी आरोपीने एका बनावट संस्थेच्या नावाने ई-मेल आणि संकेतस्थळ तयार केले होते. त्याद्वारे तरुणीच्या खात्यात 6 कोटी 46 लाख रुपये जमा होणार असल्याचे भासविण्यात आले. एवढी मोठी रक्कम मिळण्याच्या आमिषाने तरुणीने आरोपीच्या सांगण्यावरून पैसे भरण्यास सुरुवात केली.
कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेतील खात्यांतून 73 वेळा ऑनलाइन व्यवहार करून आरोपीने 29 लाख 51 हजार 947 रुपये उकळले. 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू होता. मात्र, वारंवार पैसे भरूनही अपेक्षित रक्कम खात्यात जमा झाली नाही. उलट पैशांची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले असता तिने 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी अभिजीत केशव शिंदे या नावाने वावरणाऱ्या अज्ञात व्यक्तीसह संबंधित मोबाईल क्रमांकाच्या धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड तपास करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






