मोहोर येण्याच्या प्रक्रियेला ब्रेक
| महाड | प्रतिनिधी |
कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस आंब्यासाठी सध्याचे हवामान पोषक असल्याचे वरवर वाटत असले, तरी प्रत्यक्षात मात्र खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. महाड तालुक्याच्या खाडीपट्टा परिसरात सध्या कडाक्याची थंडी पडत असून, वातावरण आंब्याला मोहोर विण्यासाठी पोषक मानले जाते. मात्र, यावर्षी हवामानातील कमालीची अस्थिरता आणि वाढत्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास खाली आल्याने निसर्गतः आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, यावर्षी एल निनोंचा प्रभाव आणि परतीच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे निसर्गचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
खाडीट्ट्यातील सुमारे 95 टक्के आंबा झाडांना अपेक्षित मोहोर येण्याऐवजी तांबूस रंगाची नवीन पालवी फुटली आहे. ही पालवी फुटल्यामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेला ब्रेक मिळाला आहे. परिणामी आबा हंगाम सुरु होण्यास एक ते दीड महिना विलंब होणार आहे. दरम्यान, हंगाम लांबणीवर पडल्यास आंबा बाजारात उशिरा येईल, ज्यामुळे सुरुवातीच्या काळातील आंब्याला जो मोठा बाजारभाव मिळतो, त्याला बागायतदारांना मुकावे लागणार आहे. खाडीपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बागांची निगा राखली आहे, पहिली फवारणी सुरु आहे. मात्र आता उत्पादनावरच संकट आल्याने आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांनी झाडांना मोहोर येईपर्यंत पाणी देणे पूर्णपणे टाळावे, जेणेकरून नवीन पालवी फुटणार नाही. तसेच, कोवळ्या पालवीचे आणि मोहोराचे संरक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तातडीने योग्य कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले. हवामानातील सर्वात मोठा धोका म्हणजे तापमानातील चढ-उतार. दिवसाचे तापमान 31 अंशांपर्यंत वर जाते, तर रात्री कडाक्याची थंडी पडते. या विरोधाभासी हवामानामुळे मोहोरातील मादी फुलांचे प्रमाण घटून मोहोर गळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मोहोर काळा पडू लागला
थंडीसोबत पडणारे दव आणि धुक्यामुळे आंबा बागांवर तुडतुडे, फुलकिडे आणि भुरी यांसारख्या घातक रोगांचा विळखा पडला आहे. अनेक बागांमध्ये मोहोर काळा पडून गळू लागल्याने बागायतदारांची चिंता द्विगुणित झाली आहे.






