तरुणाच्या धाडसीपणामुळे वाचले अनेकांचे प्राण
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील रामनगरमध्ये एक गृहिणी आपल्या स्वयंपाक घरात जेवण बनवीत असताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. सुदैवाने येथील जोगेश्वरी नगर (गावठाण) मधील एक तरुण मंदार चितळे याने प्रसंगावधान दाखवून केलेल्या धाडसामुळे वाचले अनेकांचे संसार वाचले आहेत. रामनगर मधील लक्ष्मी भूपत ही महिला घरात जेवण बनवत आतानाच सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने लक्ष्मी व तिचा पती हे घाबरून गेले. ते आपल्या सहा महिन्यांचे बालकाला घेऊन लागेच घराबाहेर पडले. आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक जमा झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने आटोक्यात आणणे शक्य नव्हते.
शेजारी असणार्या फणसेकर व गोवर्लीकर यांच्या घराला देखील आगीच्या झळा बसल्या असत्या मात्र आरडाओरड झाल्याचे पाहताच जोगेश्वरी नगर येथील तरुण मंदार चितळे याने घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान दाखवीत पेटलेल्या सिलींडरवर गोणपाट भिजवून टाकले. त्यामुळे आग काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर त्याने अंगणात असलेली गोधडी भिजवून सिलींडरवर टाकली. तत्पूर्वी मंदार याने भूपत यांच्या घरासह फणसेकर व गोवर्लीकर यांचा विद्युत पुरवठा बंद करून लागलीच विद्युत वितरण कार्यालयात संपर्क साधून संपूर्ण विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. नागोठणे पोलीस ठाण्यातही फोन करून घटनेची माहिती देण्यात आली.
सर्व आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि मंदार चितळे या तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले. काही वेळाने रिलायन्स अग्निशमन दलाचे बंब आल्यानंतर त्यांनी पेटलेल्या सिलिंडरवर फवारणी करून पहाणी केली असता सर्व सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या आगीमुळे तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. वेळेत मंदार चितळे घटनास्थळी पोहोचला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. मंदार याला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे.