। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरात मोकाट गुरांची समस्या आजही कायम असून, बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवर ही गुरे फिरताना दिसत आहेत. ही समस्या दूर करण्यात महाड नगरपालिका प्रशासनाला अपयश आले असून, महापुरात कोसळलेल्या कोंडवाड्याची दुरूस्ती केलेली नाही. या मोकाट गुरांमुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महाड शहरातील बाजारपेठेत मोकाट गुरांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीदेखील होत आहे. शहरातील छ. शिवाजी महाराज मार्ग, सावित्री मार्ग, म.गांधी मार्ग, चवदारतळे, बाजारपेठ आदी ठिकाणी मोकाट गुरांची झुंड पाहावयास मिळतात. अनेकवेळा ही जनावरे थेट रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत, तर काही वेळेस मोकाट गुरे झुंडीने गजबजलेल्या रस्त्यावरून धावत सुटतात. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून स्वैरावैरा धावणार्या या गुरांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
शहारातील विविध रस्त्यांवरून शाळकरी विद्यार्थी ये-जा करत असतात. त्यांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला आहे. शहरात तात्पुरता कोंडवाडा असावा यावर अनेकवेळा चर्चा झाल्यानंतर मोकाट गुरांच्या मालकांना दंड करण्यासंबंधी ठराव करण्यात आला होता. शहरातील समस्या नगरपरिषदेने सोडवायच्या आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मात्र, एखादा अपघात झाल्यास त्याला नगरपरिषदच जबाबदार असेल, असे तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी संजय खरात यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
या मोकाट गुरांकडे त्यांचे मालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. तरीदेखील महाड नगर परिषदेने अद्याप एकाही मालकावर कारवाईचा बडगा उचललेला नाही. त्यामुळे निर्ढावलेले हे मालक या गुरांना खुशाल शहरात सोडून देतात. मोकाट गुरांच्या संख्येत आता पुन्हा वाढ झाली असून, ठिकठिकाणी बसणार्या मोकाट गुरांमुळे अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. महाड मध्ये परांजपे विद्यालयाच्या मागील बाजूस कोंडवाडा तयार केला होता मात्र सन 2021 मध्ये आलेल्या महापुरात हा कोंडवाडा कोलमडून पडला आहे. हा पडलेला कोंडवाडा आजही ‘जैसे थे’च आहे.
वाहतुकीचा प्रश्न बिकट
मोकाट गुरांबरोबरच शहरात वाहतुकीचा प्रश्नदेखील बिकट होत चालला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची समस्या पाहावयास मिळते. अरूंद आणि खराब रस्त्यांमुळे वाहनचालक चांगल्या रस्त्यांचा वापर अधिक करत असल्याने प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कायम वाहतुक कोंडी दिसून येत आहे. महाडमधील रस्त्यांवरच फिरत्या हातगाडयांचा वावर, भाजी विक्रेत्यांनी मांडलेली दुकाने यामुळे अरूंद रस्ते अधिकच अरूंद झाले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांवर होत असलेल्या बेशिस्त पार्कींगमुळे वाहतुक कोंडीत अधिकच भर पडली आहे. शहरातील मुख्य बाजरपेठ, छ. शिवाजी चौक ते एस.टी.स्टँड, चवदारतळे, पिंपळपार, अशा विविध ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत.