। श्रीवर्धन । वार्ताहर ।
शिवसेना समर्थक व शिंदे समर्थक यांच्यात एकमेका विरोधात होणारी घोषणाबाजी, आंदोलने यामुळे काही ठिकाणी वातावरण तप्त झाले आहे. याचे पडसाद श्रीवर्धन तालुक्यात उमटू नयेत म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
बंडखोरीबाबत श्रीवर्धन तालुक्यात शिवसेनेची भूमिका काय असेल व तालुक्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी श्रीवर्धन तालुका शिवसेना संघटनेच्या पदाधिकार्यां बरोबर आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
पोलीस ठाणे येथे झालेल्या आढावा बैठकी वेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर उपतालुकाप्रमुख अरूण शिगवण, शहरप्रमुख राजेश चव्हाण व माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्याशी संवाद साधला असता या पदाधिकार्यांनी, तालुक्यातील शिवसेना संघटना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी आहे. तालुक्यात शिंदे समर्थक नावालाही नाही. त्यामुळे निदर्शने,वादविवाद यांचा कुठेही संबंध येत नाही. त्यामुळे तालुका शांत आहे. त्यातुनही वरिष्ठ पातळीवरुन काही निर्णय घेतले गेल्यास जबाबदार पदाधिकारी म्हणून आम्ही पोलीस ठाण्याशी संपर्क साधू. असे संवादा दरम्यान सांगितले. या बैठकीस उपशहरप्रमुख सुनील दर्गे, युवासेना शहराध्यक्ष शिवराज चाफेकर, अनंत गुरव, अविनाश कोळंबेकर, सुरेश मांडवकर, अजय चव्हाण तसेच तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.