। वावोशी । वार्ताहर ।
जिल्ह्यातील मुजोर शिक्षण संस्था चालक अनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे प्रवेश शुल्क घेत आहेत. त्यांच्या विरोधात सोमवार 27 जून रोजी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनील वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जाब विचारो आंदोलन छेडण्यात आले. तसेच शिक्षण संस्था चालकांवर योग्य ती कारवाई तातडीने करावी असे निवेदन शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना देण्यात आले. जिल्ह्यातील मुजोर शिक्षण संस्था चालक इयत्ता 11 वी च्या प्रवेशावेळी अनुदानित तुकड्यासाठी अनधिकृतपणे प्रवेश शुल्क घेत आहेत गोरगरीब ,कष्टकरी ,विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे.अनुदानित तुकड्यात कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही अनधिकृतपणे शुल्क जमा करीत आहेत. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिला नाही. यावेळी संतोष गायकवाड, अमित गायकवाड, प्रकाश कांबळे, योगेश गायकवाड, प्रशिक बिनेदार, आकाश केदारी, नागेश सुर्वे, संजय जाधव, विशाल वाघमारे, सुधीर कडवे, मारुती देवघरे, ओमकार धुमाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.