काहीजण पोलिसांच्या ताब्यात; परिसरात खळबळ
। नागाव । वृत्तसंस्था ।
आसाममधील नागाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. नागाव जिल्ह्यातील कंगारू न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आले. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीचा मृतदेहही पुरण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी एम. दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव जिल्ह्यातील बोर लालुंग भागातील कंगारू न्यायालयात एका हत्येप्रकरणी सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान आरोपी व्यक्ती हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर कंगारू न्यायालयाने संबंधित व्यक्तीला जिवंत जाळण्याचा आदेश दिला. त्यानुसार दोषीला सार्वजनिक ठिकाणी जिवंत जाळण्यात आले. रणजीत बोरदोलोई असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काय आहे कंगारू न्यायालय?
कंगारू न्यायालय हे भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण काही वर्षाआधीच ही न्यायालये भारतात बेकायदेशीर ठरवण्यात आली असून त्यांना गुन्हेगारी श्रेणीत टाकण्यात आले आहे. असे असूनही अजूनही गावपातळीवर ही न्यायालये सक्रिय आहेत. अशा न्यायालयात एखाद्या व्यक्तीला आरोपी मानून बेकायदेशीर किंवा असंवैधानिक पद्धतीने शिक्षा दिली जाते. कोणत्या तरी एकाच बाजूने हा निकाल सुनावला जातो. अशा न्यायालयांमध्ये पुराव्यांच्या आधारे निकाल सुनावला जात नाही, तर लोकांच्या दबावाखाली किंवा लोकांच्या भावनांचा प्रवाह लक्षात घेऊन निकाल दिला जातो. एका अहवालानुसार, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये कंगारू न्यायालये सर्वाधिक सक्रिय आहेत. या राज्यांमधून अनेकदा हृदय पिळवटून टाकणार्या घटना समोर येत असतात. कंगारू न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, खून आणि बलात्कार करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
एकाच कुटूंबातील 4 जणांना दिली फाशी
काही दिवसांपूर्वी बिहारमधील गया जिल्ह्यात माओवाद्यांनी कंगारू न्यायालयाच्या आदेशानुसार एकाच कुटुंबातील चार जणांना फासावर चढविले होते. काही महिन्यांपूर्वी आसामसारखीच एक घटना पश्चिम बंगालमधील मालदा येथे घडली होती. येथील एका व्यक्तीला कंगारू न्यायालयाने जिवंत जाळण्याचा आदेश दिला होता. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकांनी संबंधित व्यक्तीला पेटवून दिले होते. तर ओडिशातील मयूरभंज येथेही कंगारू न्यायालयाची क्रूरता पाहायला मिळाली होती. वेगवेगळ्या समाजातील तरुण-तरुणीचं प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर गावकर्यांनी त्यांचं मुंडन करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली होती.