। मुंबई । प्रतिनिधी ।
जवळपास दोन वर्षांपूर्वी प्रचंड मोठं वादळ उठलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. वादळी घडामोडी झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेतून जवळपास नाहीसं झालं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या प्रकरणावरची धूळ झटकली गेली असून एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर केला आहे.
या आरोपपत्रामध्ये सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, सुशांतच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी आणि इतर अशा एकूण 35 आरोपींची नावं या मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या आरोपींनी मिळून सुशांतला ड्रग्ज पुरवलं आणि त्याला ड्रग्जचं व्यसन लावण्यात हातभार लावला, असा दावा या मसुद्यात करण्यात आला आहे.
सुशांतला ड्रग्जचं व्यसन
रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि त्यांच्या इतर काही मित्रांनी मिळून सुशांतला ड्रग्जचं व्यसन लावल्याचं या मसुद्यात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यासोबतच सुशांतच्या बँक अकाऊंटमधून ङ्गपूजा सामग्रीफच्या नावाने ड्रग्जची खरेदी केली जात असल्याचं देखील मसुद्यात म्हटलं आहे. 2020मध्ये सुशांत किंवा रिया चक्रवर्तीच्या मागणीवरून त्यांना ड्रग्ज पुरवलं जात होतं. रिया चक्रवर्ती गांजा खरेदी करून सुशांतपर्यंत पोहोचवत होती. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या बँक अकाऊंटमधून पूजा सामग्रीच्या नावाखाली ड्रग्जची खरेदी करत होता, असा देखील उल्लेख एनसीबीच्या आरोपपत्राच्या मसुद्यात केल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. मृत्यूच्या 2 वर्ष आधीपासूनच सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज मिळत होते, असा दावा या मसुद्यामध्ये करण्यात आला आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतकडे काम करणारे दोन कर्मचारी यांच्यामार्फत त्याला ड्रग्ज पुरवलं जात होतं. 2018पासून सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घेत होता, असंही मसुद्यात नमूद केलं आहे.
नायजेरियन व्यक्तीकडून गांजा खरेदी
अभिनेता अर्जुन रामपालच्या पार्टनरचा भाऊ अगिसिलाओस दिमित्रीयादेस हा एका नायजेरियन व्यक्तीकडून गांजा खरेदी करायचा आणि बॉलिवुडमधील हाय प्रोफाईल वर्गाला पुरवायचा, असं देखील एनसीबीनं मसुद्यात म्हटलं आहे. मात्र, हे ड्रग्ज घेणारे हायप्रोफाईल लोक नेमके कोण होते? याचा उल्लेख या मसुद्यात नाही. आर्थिक फायद्यासाठी आरोपींकडून ड्रग्जचा व्यवहार केला जायचा, असं यात म्हटलं आहे. एनसीबीनं हा मसुदा न्यायालयात सादर केला असून त्याचा आढावा घेतल्यानंतर कोणत्या आरोपांखाली आरोपींवर खटला चालवायचा, यासंदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे.