। उरण । वार्ताहर ।
पावसाचा जोर वाढल्याने चिरनेर परिसरात अचानक कोंबड्यांचा मूत्यू दर वाढला आहे. घरगुती पाळीव गावठी कोंबड्या आणि कुक्कुटपालनातील कोंबड्या या काही कळण्याच्या आतच जलदगतीने मरण पावत आहेत. त्यातच पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधे उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
चिरनेर परिसरातील शेतकरी, आदिवासी बांधव हे आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा, यासाठी घरगुती गावठी कोंबड्याचे पालन करतात. तसेच काही शेतकरी हे कुक्कुटपालनाच्या माध्यमातून भातशेतीला जोडधंदा म्हणून आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने चिरनेर परिसरात अचानक कोंबड्यांचा मूत्यूदर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पुर्वीपासून गावठी कोंबड्याचे पालन घरातच करत आहोत. मात्र यावर्षी जुलै महिन्यात घरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात अचानक कोंबड्यांचा मूत्यूदर वाढला आहे. जवळजवळ घरातील 35 च्यावर लहान, मोठ्या कोंबड्या मरण पावल्या आहेत.असे असतानाही पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी किंवा औषधे उपलब्ध नाहीत. तरी शासनाने कोंबड्याचा मूत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना करावी.
-विजय पाटील, शेतकरी