। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे ।
पावसाळ्यात दोन महिने बंद असलेली खोल समुद्रातील मासेमारी येत्या 1 ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी लागणार्या पूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. तर काही मच्छिमार नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीस निघतील, अशी माहिती मिळाली आहे.
दरवर्षी सुरक्षेच्यादृष्टिने 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी असते. 1 ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारी पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी सोमवारी बोलताना दिली.
वादळी परिस्थिती नसली तरी पाण्याला मोठा करंट आणि वेग असून मासेमारीस निघताना सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊनच निघावे लागेल. निम्यापेक्षा अधिक नौका नारळी पौर्णिमा अथवा 15 ऑगस्टच्या दरम्यान मासेमारीस निघतील, अशी माहिती एकदरा येथील मच्छिमारांनी दिली.
ज्या नौका 1 ऑगस्टपासून मासेमारीस जाणार आहेत, त्या नौकावर मासेमारी जाळी भरण्यास सुरुवात झाली आहे. खलाशी वर्ग, नौकांची रंगरंगोटी, इंजिन सर्व्हिसिंग, डिझेल, इलेक्ट्रिक वस्तु, बर्फ आदी आवश्यक साहित्य भरले जात आहे. मासेमारीसाठी लागणारी जाळीदेखील किमती आणि महत्वाची असते. सहा सिलेंडर मोठया नौकेवर 130 ते 140 जाळी असतात. अशा प्रत्येक जाळीची किंमत सुमारे 8 हजार असल्याची माहिती युवा मच्छिमार विक्रांत भोबु यांनी दिली.
मासेमारी करताना काही माशांमुळे जाळी फाटण्याची शक्यता असते. असे झाल्यास मालकाचे खूप नुकसान होऊ शकते. समुद्रात कधी काय होईल याचा नेमच नसतो. त्यामुळे सतत सतर्क आणि जागृत राहावे लागते अशी माहिती देखील त्यांनी दिली. यंदा मासळी समाधानकारक मिळेल, अशी भावना मच्छिमारांनी व्यक्त केली. मासेमारीस जाण्यासाठी प्रत्येक नौकेला 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो.