। अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नारंगी येथील भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट 18 गाव समिती चिंचवलीच्या भुवनेश्वर मंदिरातील पिंडीला रविवारी चांदीचे पुनर्लेपन करण्यात आले. मुंबईतील देणगीदार सतीश वाळके आणि परिवाराने हे चांदीचे पुनर्लेपन स्वखर्चाने करून दिल्याने मंदिर ट्रस्टीने त्यांचे आभार मानले आहेत. पिंडीवर नव्याने पुनर्लेपन केल्याने भाविकही आनंदित झाले आहेत.
या मंदिरातील पिंडीवर पूर्वी पितळी लेपन होते. त्यावर मुंबईतील सतीश वाळके परिवाराने चांदीचे लेपन केले होते; परंतु 14 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्रीच्या वेळी अनोळखी चोरट्यांनी या पिंडीवरील चांदीचे लेपन चोरून नेल्याने याबाबत पोयनाड पोलिसात ट्रस्टींनी तक्रार दाखल केली होती; परंतु सहा महिने उलटूनही पोयनाड पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश आल्याने ट्रस्टी चिंतेत होते. या चोरीबाबतची माहिती देणगीदार सतीश वाळके यांना ट्रस्टींनी दिल्यानंतर वाळके यांनी ट्रस्टींना दिलासा देत पिंडीवर नव्याने चांदीचे पुनर्लेपन स्वखर्चाने करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार वाळके यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध ज्वेलर्स नाना वेदक यांच्याकडे पिंडीवरील लेपन तयार करायला दिले होते. ते लेपन तयार झाल्यानंतर रविवारी (ता.24) नाना वेदक आणि त्यांच्या सहकार्यांनी पिंडीवर लेपन बसविले. त्याबद्दल ट्रस्टींनी वाळके यांच्यासह परिवाराचे आभार मानले आहेत.
पिंडीवरील लेपन बनविण्यासाठी आठ किलो चांदी वापरण्यात आली असून, हे लेपन तयार करण्यासाठी 15 दिवस लागले. त्यासाठी एकूण सहा लाख 70 हजार रुपये खर्च आल्याची माहिती वेदक यांनी दिली. तसेच श्रीक्षेत्र भुवनेश्वर मंदिरात असलेल्या पिंडीवरील चांदीच्या लेपनाची चोरी झाल्यानंतर ट्रस्टींनी मंदिरात जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत केली आहे. त्याचबरोबर मंदिरात 29 जुलै रोजी सकाळी सात वाजता महारुद्राभिषेक सोहळा आणि 30 जुलै रोजी सकाळी सात वाजता होमहवनासह आरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली.