महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
| अलिबाग | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना, युवा महाराष्ट्र फाउंडेशन या अधिकृत राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद घाडगे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. मिलिंद घाडगे हे अलिबाग येथील पीएनपी वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तसेच एक उदयोन्मुख कवी आणि साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. सातारा येथील दैवज्ञ सांस्कृतिक भवनमध्ये श्रीमंत वृषालीराजे भोसले व इत्तर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला.
शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रा. मिलिंद घाडगे यांना प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी प्रा. मिलिंद घाडगे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, महाविद्यालयाचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गिते तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी प्रा. मिलिंद घाडगे यांचे अभिनंदन केले.







