| पनवेल । वार्ताहर ।
डोंगर, धबधबे, हिरवाई पाहण्यासाठी मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खारघरमध्ये मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. पांडवकडासह उत्सव चौक, शिल्प चौक, सेंट्रल पार्क, जलवायू विहार ही ठिकाणे खारघरमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला निवांत परिसर, पांडवकड्याच्या कुशीत डौलदारपणे वसलेले सेंट्रल पार्क, विस्तीर्ण पसरलेले गोल्फ मैदान. खारघरमधील हेच निसर्ग सौंदर्य आपल्या नजरेत साठवण्यासाठी आणि कॅमेराबद्ध करण्यासाठी लाखो पर्यटक पावसाळ्यात येथे दाखल होत आहेत. पावसाळ्यात येथील पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सूक असतात. येथे धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटत येथील निसर्गाचे रुपडे कॅमेराबद्ध करण्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. याशिवाय पांडवकड्याच्या डोंगर पायथ्याशी हिरवेगार पसरलेले गोल्फ मैदान पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो.
त्याच्याच समोर जवळपास 250 एकरात वसलेले सिडकोच्या आखत्यारित येणारे मोठे सेंट्रल पार्कची भव्यता तर पर्यटकांना भिरळच घालते. आच्छादलेली हिरवाई, सावली देणारी भलीमोठी झाडे, आजूबाजूला दिसणारे डोंगर यामुळे संपूर्ण सेंट्रल पार्क पाहण्याची पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. भारतीय वाद्यांची ओळख सांगणारे थीम पार्क, तेथून पुढे गेल्यावर दिसणारा मोठा तलाव या उद्यानाची शोभाच वाढतात.सर्वत्र पसरलेले लुसलुशीत गवत, पलीकडे उंच पांडवकडा, उत्सव चौक, शिल्प चौक, जलवायू विहार ही आकर्षक ठिकाणे हे सर्व पाहून आपण शहरापासून कुठेतरी दूर एखाद्या निसर्गाने नटलेल्या गावात आलोय की काय असा अनुभव खारघर पर्यटकांना देऊन जाते. त्यामुळे अशा ठिकाणी वारंवार येणार्या पर्यटकांची संख्या मोठी असून खारघर आकर्षक असे पर्यटनस्थळ ठरत आहे.