सातबारा उताऱ्यावर नावनोंदणीसाठी घेतली अडीच हजारांची लाच
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
बक्षिसपत्र केलेली जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी अडीच हजार रूपयांची लाच स्वीकारताना रोहा तालुक्यातील घोसाळे मंडळ अधिकारी राजेश वसंत जाधव याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
यातील तक्रारदार यांच्या वडीलांनी त्यांच्या मालकीची जमीन तक्रारदार यांना बक्षिसपत्र रजिस्टर करून दिली होती.त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करून त्याची प्रत उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ अधिकारी राजेश जाधव यांनी 3 हजार रूपये इतक्या लाचेची मागणी केली होती. याबाबत रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.
या दरम्यान पडताळणी सुरू असताना तडजोडीअंती लाचेची रक्कम कमी करून ती अडीच हजार रूपये इतकी करण्यात आली. ही रक्कम जाधव यांचा सहकारी महादेव मोरे याला स्वीकारण्यास सांगितली. जाधव यांचयासमक्ष ही रककम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पोलीसांनी दोघांविरूदध गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे , सहायक फौजदार अरूण घरत , कर्मचारी दीपक मोरे , सूरज पाटील, कौस्तुभ मगर यांनी या कारवाईत भाग घेतला .