। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग- पेण मार्गावर कार्लेखिंडीत शुक्रवारी (दि.5) रात्री भरधाव कार दरीत कोसळली. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कार्लेखिंडीत शुक्रवारी आय 20 गाडी भरधाव वेगाने अलिबागकडुन पेणच्या दिशेकडे जात होती. मात्र चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळली.
यावेळी जिल्हागस्त करुन परतणारे पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस नाईक मितेष म्हात्रे व चालक पोलीस शिपाई पाटील यांनी याठिकाणी नागरिकांची गर्दी पाहिली. तसेच चौकशी केली असता दरीत कोसळलेल्या कारमध्ये तिघेजण अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
खोल दरी, गर्द अंधार, पावसामुळे झालेला निसटता रस्ता, चिखल या आव्हानांना सामोरे जात पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीय शिपाई नितिन पाटील यांनी तात्काळ दरीत उतरुन जखमींना वर आणण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच मितेष म्हात्रे यांनी रेस्क्युसाठी लागणारे रस्सी, बॅटरी यांची उपलब्धता करुन तात्काळ रुग्णवाहिका बोलावुन घेतली. याशिवाय अलिबाग व पोयनाड पोलीस ठाण्यात घटनेबाबत माहिती दिली. त्यामुळेच जवळपास एक तासाच्या रेस्क्यु आपरेशननंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात पोलिसांना यश आले.