| मुंबई | वृत्तसंस्था |
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांपाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. 6 ऑगस्ट म्हणजे आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत 1039.79 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील 100 कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. त्यातील 55 लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केलाय. त्यांनी याबाबत सेशन्स कोर्टातही कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.