मुख्याधिकार्यांच्या काम बंदच्या आदेशाला केराची टोपली
| पेण | प्रतिनिधी |
पेण दातार आळीमध्ये 20 39, 20 40, 20 41 या तीन सीटी सर्व्हे नंबरमध्ये रॉयल ग्रुपच्या श्री साई डेव्हलपरने पूर्ण डोंगराचे उत्खनन करून आपले बांधकाम सुरू केले. या खोदकामाला स्थानिकांचा विरोध असतानाही काम केल्याने आज येथील रहिवाशांच्या घरांना तडे गेले आहेत. तहसील आणि नगरपालिकेच्या पंचनाम्यानंतर मुख्याधिकार्यांनी काम बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आदेश झुगारुन याठिकाणी काम सुरू केल्याने संबंधित बिल्डर रहिवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप समाजसेवक भूषण कडू यांनी केला आहे.
दरम्यान, डोंगराचे उत्खनन केल्याने स्थानिकांच्या घरांच्या भिंतीना तडा गेल्याचे रहिवाशांचे म्हणणे असून, सुरेश माळी यांचे स्वयंपाकाची खोली खोदकामाच्या बाजूने सरकली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तहसील व नगरपालिकाने स्वतंत्रपणे आपापले पंचनामे केले. त्यानंतर मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी श्री साई डेव्हलपर्रच्या माणसांना तातडीने कामे बंद करण्यास सांगितले. तात्पुरते काम बंददेखील केले. परंतु, मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा काम सुरु केले. त्यानंतर खोदकामाच्या वरच्या बाजूने जमीन खचून त्या ठिकाणी मोठे भगदाड पडले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला.
श्री साई डेव्हलपर्रच्या माणसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मातीच्या गोण्या भरून तो पडलेला भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रहिवाशांनी हे ही सांगितले, की ही जागा तुमची आहे. परंतु, आमच्या सुरक्षतेच्या दृष्टीने भिंत बांधून द्या. परंतु, याबाबीकडे बिल्डरच्या माणसाने कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समाजसेवक भूषण कडू यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद केले. आणि या गोष्टीची कल्पना त्यांनी नगरपालिकेत दिली.
रॉयल ग्रुपचे श्री साई डेव्हलपर्स यांना स्थानिकाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने काहीही पडलेले नाही. ते अधिकार्यांच्या आदेशालादेखील जुमानत नाहीत. जर काम बंदचे आदेश मुख्याधिकारी देत आहेत, तर, काम बंद ठेवणे गरजेचे होते. असे न करता काम सुरु ठेवून स्थानिकांच्या जीवाशी खेळण्याचे कामच श्री साई डेव्हलपर्स करत आहेत. हे चित्र यावरून स्पष्ट होत आहे.