। मुंबई । वृत्तसंस्था ।
नितीश कुमार यांनी सोमवारी भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
बैठकीनंतर नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
बिहारमध्ये आज नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची तर राजद नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार आज आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार आहेत.
आज नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांचा शपथविधी होणार असला तरी, बिहारच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र होणार नसल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर काही दिवसांनी होणार.