| कोर्लई | वार्ताहर |
विनायक मेटे यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्राचे संघर्षशील नेतृत्व हरपले,अशी शोकमग्न प्रतिक्रिया शिवसंग्रामचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत यांनी व्यक्त केली आहे.
मेटे यांना आदरांजली वाहताना सावंत यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला पराकोटीचा अभिमान, सामान्य कार्यकर्ता ते वरिष्ठ पदाधिकारी ह्यांच्यात मिसळून काम करण्याची सचोटी, विविध राजकीय नेते, सामाजिक संघटना, अनेक क्षेत्रांतील मान्यवर ह्या सर्वांशी असलेले आपुलकीचे नातेसंबंध मेटे यांनी जोपासले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेला अतोनात संघर्ष कायम स्मरणात राहिल,असेही सावंत यांनी नमूद केलेले आहे.
आज परत एकदा महाराष्ट्र एका संघर्षशील नेतृत्वास मुकला हे अधोरेखित झाले आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही आणि आक्रमक असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने अकाली गमावले.