जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी प्रवाशांची व्यवस्था करण्याची मागणी
बोर्लीपंचतन | वार्ताहर |
मुंबई, पुणे आणि कोकण या विभागाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगाव. याच बसस्थानकातून रोज असंख्य बस विविध मार्गावर प्रवाशांची ने-आण करीत असतात. माणगाव बसस्थानक मध्यवर्ती ठिकाण असल्याने नेहमीच येथे प्रवाशांची वर्दळ असते. गेली कित्येक दिवस हे बसस्थानक शेवटची घटका मोजत उभे होते. गेली वर्षे दीड वर्ष स्लॅबखाली मॅट जाळी बांधून हे कार्यरत आहे. यामुळे कधीही अपघात होण्याचा खूप मोठा धोका होता. आज हे जीर्ण झालेले बसस्थानक तोडण्यात आले आहे.
जुलै महिना हा धुवाधार पावसाचा असल्याने आत्ता प्रवाशांनी कोठे थांबायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माणगाव बसस्थानक जीर्ण झालेले असताना पावसाळ्याआधीच का त्याची डागडुजी केली नाही, हाच प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे. गेले कित्येक महिने मोडकळीस आलेल्या या बसस्थानकाची दुरुस्ती यापूर्वीच का करण्यात आली नाही, आताच पावसाच्या मोसममध्ये प्रवाशांना अन्य निवार्याची व्यवस्था न करता बांधकामाला सुरुवात केली जात आहे. किमान तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशांच्या थांब्यासाठी निवारा उभारावा, हीच प्रवाशांची मागणी आहे.