महाड I प्रतिनिधी
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी करण्यावर आपण भर देणार असल्याची ग्वाही रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी सायंकाळी नडगाव येथे बोलताना दिली.
नडगाव ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.या भूमि पूजन सोहोळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महीला सरचिटणीस अपेक्षा कारेकर. प्रदेश सदस्य संतोष देशमुख,जिल्हा संघटक चंद्रकांत बुवा जाधव, महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडीक, नडगावचे सरपंच संजय देशमुख, ,उपसरपंच निता मांडे , शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजू मांडे, शरद मांडे, संतोष हाटे, शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे, सरपंच संदेश बोबडे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करित आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करित जनतेच्या आरोग्याला महत्व दिले. लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय या काळात घ्यावे लागले , त्यावर टीका झाली ; पण हे निर्णय जनतेच्या हितासाठीच होते.
महाड येथील शासकीय दूध डेअरीच्या जागेत नवे प्रशासकीय भवन आणि न्यायालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. महाड पोलादपूर तालुक्यात दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी कायम स्वरूपी एनडीआरएफ तळ कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मागणीसाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी प्रयत्न केलेच; आपणही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून त्यांना या परिसरात या तळाचे महत्व पटवून दिले असेही त्यांनी सांगितले.
नडगांव ग्रामपंचायत ही महाड तालुक्यातील एक श्रीमंत ग्राम पंचायत आहे. सव्वा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेली ग्रामपंचायतीची ही इमारत प्रेक्षणिय असली पाहिजे. महामार्गालगत असलेली ही इमारत पाहण्यासाठी महामार्गावरून जाणारे पर्यटक देखील थांबले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर शेठ आणि आभार संतोष हाटे यांनी मानले.